अंबादास दानवे काड्या करण्याचे काम करतो - चंद्रकांत खैरे
छ.संभाजीनगर प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना (उबाठा) गटाचे नेते माजी खा चंद्रकांत खैरे यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर घणाघाती टीका करत दानवे नेहमी काड्या करण्याचे काम करतो असे खळबळजनक आरोप केले आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे व अंबादास दानवे यांचा पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून शिवसेना उबाठा गटातील खैरे दानवे कार्यकर्त्यांमध्ये मात्र या नेहमीच्या वादामुळे नाराजीचा सूर दिसत असून जिल्ह्यात कोणत्या नेतृत्वाच्या सोबत काम करावे हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे यामुळेच मागील काळामध्ये छत्रपती संभाजीनगर शहर जिल्ह्यातील अनेक मोठे नेते कार्यकर्ते शिवसेना उबाठा गट सोडून इतर पक्षात पक्षप्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे.एकेकाळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगरचे राजकारण हे चंद्रकांत खैरे यांच्या आजूबाजूला फिरताना दिसत होते परंतु अनेक निष्ठावंत शिवसैनिक पक्ष सोडून गेल्याने विरोधकांकडून पक्षांमध्ये फक्त चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे हेच शेवट राहतील असे भाकीत केले जात आहे.
याचबरोबर स्थानिक शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांची देखील अप्रत्यक्षरीत्या हीच भावना निर्माण होत असल्याचे चित्र या वादामुळे जिल्ह्यात निर्माण झाले आहे. खैरे दानवे यांचा पक्षांतर्गत वाद हा पक्ष कार्यकर्त्यांसह पक्षश्रेष्ठींना देखील डोकेदुखी ठरत असून याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment
0 Comments