Type Here to Get Search Results !

पंचवटीत भीमगीतांचा जल्लोष काळाराम मंदिर सत्याग्रहींना भावपूर्ण अभिवादन



काळाराम मंदिर भूमिपुत्र अभिवादन सभेतर्फे कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट उभारण्याची मागणी

नाशिक प्रतिनिधी

 “जसा गुलाब बोलतो या सुगंधी जाईला…” या भीमगीताच्या सुरांनी पंचवटीतील गोदाघाट परिसर भारावून गेला. सोमवारी (दि.२) रोजी पंचवटीतील गौरी पटांगणावर काळाराम मंदिर भूमिपुत्र अभिवादन सभेतर्फे आयोजित काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते किशोर घाटे यांच्या पुढाकारातून आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काशिनाथ हिरे होते.सुप्रसिद्ध गायक संतोष जोंधळे, चेतन लोखंडे व आम्रपाली पगारे यांनी सादर केलेल्या भीमगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. रोहित जाधव (ऑक्टोपॅड), संकेत पगारे (ड्रम), अभय मोरे (गिटार), सौरभ रणधीर (ढोलकी), संदीप जगताप (कॅसिओ), विशाल चौधरी (ढोलक), गौतम जाधव (रोटो) तसेच सहगायक किरण गायकवाड व आशिष गायकवाड यांनी वाद्यवृंदातून सुरेल साथ दिली.कार्यक्रमादरम्यान “भीम आवडीन बोले रामू-रामू रमाईला”, “माझ्या भीमाच्या कोटाला कलम सोन्याचा”, “लय दिमाखाने केला करार पुण्याचा”, “उजाड पुण्यात शिवबा धरतो सोन्याचा नांगर”, “सोन्याच्या पेनाने घटना लिहितो भीमराव आंबेडकर”, “माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमान”, “गुलामी का टूट गया जाल यह मेरे भीम का कमाल” तसेच “घालून सूट-बूट-टाय फॉरेनला भीमांनी केलंय बाय” यांसारख्या गीतांनी वातावरण भारावून गेले. प्रत्येक गीतावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

प्रमुख अतिथी म्हणून त्र्यंबकेश्वरच्या नगरसेवक पूजा सोनू खाटीकडे, नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक कविता अमोल नाईक, साधना पवन मटाले, वन विभागाच्या माधवी जाधव, अर्जुन पगारे, माजी सरपंच बाळासाहेब गांगुर्डे, आरपीआय चळवळीतील महिला नेत्या आरती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

समाजरक्षक अर्जुन पगारे यांनी काळाराम मंदिर सत्याग्रह दिनाच्या शुभेच्छा देत मानव समतेसाठी झालेल्या या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व अधोरेखित केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनालेखनामुळेच वंचित समाजाला सन्मानाचे स्थान मिळाले असल्याचे त्यांनी नमूद केले. बुद्धवासी रोशन घाटे यांचा उल्लेख करताच वातावरण भावूक झाले; त्या क्षणी किशोर घाटे यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. शेवटी “क्रांतिकारी जय भीम”च्या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली.

कार्यक्रमासाठी के.के. काळे, सुरेश नेटावटे, रमेश मुंढे, बाबा चव्हाण, जितेष शार्दुल, संजय तेजाळे-पवार, कच्छेभान आव्हाड, राहुल घाटे, विनायक वाघमारे, संकेत घाटे, विराज बच्छाव, स्वप्निल शिरसाट, शरद जगताप, गणेश नवले, अशोक उशिरे, राजू नेटावटे, संकेत काळे, सुनील जाधव, रवी काळे, तथागत तेजाळे, शशांक हिरे, धरम गोविंद, डॉ. गिरीश मोहिते आदींसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट उभारण्याची मागणी -

 आरपीआयचे ज्येष्ठ नेते किशोर घाटे यांनी कार्यक्रमात मांडलेल्या ठरावास एकमुखाने मंजूर करण्यात आला की, गोदातीरी (पूररेषा सोडून) शासनाने स्वखर्चाने भव्य “डॉ. बाबासाहेब आंबेडकर इन्स्टिट्यूट” उभारावे. बाबासाहेबांनी घटना लिहून संपूर्ण मानवजातीचे कल्याण केले आहे. गोदाघाटावरील शांतता विद्यार्थ्यांच्या भविष्यास प्रेरणादायी ठरावी आणि त्यांची सत्याग्रह चळवळ जिवंत राहावी, यासाठी हा उपक्रम राबवावा, अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली. समितीतर्फे लवकरच मुख्यमंत्री व सामाजिक न्याय व समाज कल्याण मंत्री यांना याबाबत पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे घाटे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments