Type Here to Get Search Results !

No title


टंकलेखन-लघुलेखन असोसिएशनच्या वतीने भाजपा नेते सुधाकर बडगुजर यांना निवेदन 


नाशिक प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतील ‘लघुलेखक’ पदे मृत संवर्ग म्हणून घोषित करून ती रद्द करण्याच्या हालचालींवर नाशिक जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा टंकलेखन-लघुलेखन इन्स्टिट्यूट असोसिएशनच्या वतीने भाजपा नेते सुधाकर बडगुजर यांना निवेदन देण्यात आले. 

संघटनेने आपल्या निवेदनातून स्पष्ट केले की, हा गंभीर विषय मंत्री स्तरापर्यंत पोहोचवून शासनाने घेतलेला निर्णय तात्काळ मागे घ्यावा, यासाठीच हे निवेदन सादर करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे व संस्थाचालकांचे मोठे नुकसान होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.निवेदनात नमूद करण्यात आले की, लघुलेखक पद हे शासकीय कामकाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. गोपनीय अहवाल, तपासणी नोंदी, न्यायालयीन प्रक्रिया आणि मंत्रालयीन कामकाजात लघुलेखकांची भूमिका अनिवार्य आहे. ही पदे रद्द केल्यास प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.तसेच, हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे लघुलेखक पदासाठी तयारी करत असून, शासनाच्या या निर्णयामुळे त्यांच्या भविष्यावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांतील विद्यार्थ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरणारा हा निर्णय असल्याची भावना संघटनेने व्यक्त केली.

महसूल, गृह व वित्त विभागांमध्ये अनेक पदे रिक्त असूनही भरती प्रक्रिया सुरू होत नसल्याबद्दलही नाराजी व्यक्त करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या युगातही मानवी कौशल्याचे महत्त्व कमी झालेले नसून, शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.दरम्यान, या निर्णयाचा परिणाम टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या संस्थाचालकांवरही होणार असून, त्यांच्या उपजीविकेवर संकट ओढवण्याची शक्यता आहे.शासनाने हा निर्णय तात्काळ रद्द करून लघुलेखकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.या निवेदनावेळी सुनील धामणे, नलिनी धामणे, सुरेश देवरे, उदय देशपांडे, शिवाजी भोसले, तृप्ती पवार, साक्षी चौधरी, प्रथमेश भुजबळ, योगिता वाघमारे, पूर्वा कापडी, उर्मिला पवार, अश्विनी अहिरे, राखी ब्राह्मणकर, प्रज्योत गुर्डे, साक्षी जैन, निकिता लगड, आकाश जेजुरकर, विशाल राजपूत, भक्ती गायकवाड, निशा शेदवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments